कोल्हापूर (प्रतिनिधी) : तलाठी आणि ग्रामसेवक यांनी आप-आपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करावे. गावात रुग्ण कसा वाढणार नाही यासाठी ग्राम समित्यांना सक्रीय करुन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) दिले.
जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी आज संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात सर्व्हेक्षण करुन त्याची माहिती भरावी. रुग्णांचे स्वॅब घेवून अँन्टीजेन टेस्ट करावी. सर्व्हेक्षणाचे काम नाकारणाऱ्यांवर कारवाई करावी. तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनीही सर्व्हेक्षण बरोबर होत की नाही याची गावात भेट देवून पाहणी करावी. प्रतिबंधक क्षेत्रात अंमलबजावणी करावी. तलाठी, ग्रामसेवक यांनी गाव न सोडता सक्रीयपणे काम करावे. ग्रामसमित्या सक्रीय करुन परिणामकारक नियोजन करावे. अजिबात शिथिलता येवू देवू नका. त्यामुळे आपआपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करा. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तुही नाहीत याचे फलक प्रत्येक आस्थापनाच्या दर्शनी भागात लावून या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात या मोहिमेचे उल्लंघन करणारी दुकाने आठवडा भरासाठी सील करावीत. तसेच फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याचे आदेशही दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, काँटॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा. सर्व्हेक्षणामध्ये इली आणि सारीच्या रुग्णांना शोधून संदर्भीत करावे. नो मास्क नो एंट्री, नो मास्क नो गुड्स ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. उल्लंघन करणारी दुकाने सील करुन टाका. एचआरसीटी करणाऱ्या लॅबचा ग्रुप तयार करुन त्यावर अहवाल मिळावावा. त्यानुसार स्वॅब तपासणीसाठी पाठपुरावा करावा. त्या संदर्भात लॅबशी पत्रव्यवहार करुन स्वॅब कलेक्शन केंद्र उभे करावे अशा सूचना दिल्या.
तर महानगरपालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महापालिका क्षेत्रात परिणामकारक राबवावी. त्याच बरोबर नो मास्क नो एंट्री याची काटेकोर अंमलबजावणी करावी,अशा सूचना दिल्या.
तसेच जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. साळे यांनीही यावेळी मार्गदर्शन करुन विशेष आरोग्य तपासणी मोहीम करण्याबाबत तसेच गाव निहाय सुक्षम नियोजन करण्याची सूचना केली.