सांगली : कोल्हापुरात बंडखोरी केलेल्या काँग्रेस नेत्यावर कारवाई केली. पण सांगली लोकसभेत बंडखोरी केलेले विशल पाटील यांच्यावर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. दरम्यान, गुरूवारी सांगलीत झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोर नेते विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.

तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी सल्ला दिला की, विशाल पाटील यांचे वय लहान आहे, त्यामुळे त्यांच्या भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. याचपार्श्वभूीमीवर आता विशाल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्यावर शिस्तभंगाच्या कारवाई करणार्‍यांनी आपले काँग्रेससाठी योगदान किती याचे आत्मपरिक्षण करावे असे आव्हानच विशाल पाटील यांनी केले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

विशाल पाटील म्हणाले की, माझ्यावर कारवाई करताना, त्या पत्रावर सही करणार्‍यांनी आपले काँग्रेससाठी योगदान काय हे पाहावे. ते आमच्या कुटुंबापेक्षा जास्त आहे का? हे तपासावे आणि त्यांनी कारवाई खुशाल करावी. आमच्या कुटुंबातील स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्यात एकहाती काँग्रेसची सत्ता आणली होती. काँग्रेस पक्षाला वाढवण्यामध्ये वसंतदादा पाटील आणि कुटुंबाचं मोठं योगदान आहे. हे लक्षात घ्यावे, असे विशाल पाटील म्हणाले.

कारवाईसंदर्भात बोलताना विशाल पाटील म्हणाले की, मला काँग्रेस पक्षाचा कोणताही लेखी आदेश आला नव्हता. त्यामुळे मी कोणताही आदेश भंग केला नाही. मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा विश्वासही विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपच्या माजी आमदार आणि नगरसेवकांचा विशाल पाटील यांना पाठिंबा
दरम्यान, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यानंतर आता भाजपाच्या दोन माजी आमदारांनी आणि 4 नगरसेवकांनी विशाल पाटील यांना साथ दिली आहे. माजी आमदारांनी पक्षाला सोडचिट्टी देत विशाल पाटील यांच्या प्रचारात सामील झाले आहेत, तर खासदार संजयकाका पाटील यांच्यावर नाराज असलेल्या मिरजमधील नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना सांगलीत बळ मिळताना दिसत आहे.