कोल्हापूर (प्रतिनिधी) : कचरा उठावासाठी वापरण्यात येणाऱ्या टिपरवर कंत्राटी चालक नेमण्यात आले आहेत. यासाठी डी. एम. एंटरप्राइजेसकडे १०७ टिपर व शिवकृपा इंटरप्राइजेसकडे ६५ टिपर चालकांचा ठेका होता. यातील डी. एम. एंटरप्राइजेस कंत्राट संपल्याने त्यांना पुढील निविदा निघेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आले. परंतु डी. एम. एंटरप्राइजेस बद्दल अनेक तक्रारी येत असल्याने त्यांना ठेका रद्द करण्याबद्दल महापालिकेने नोटीस दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने उपायुक्त रविकांत आडसुळे यांची भेट घेऊन या चालकांना महापालिकेने ठोक मानधनावर घ्यावं अशी मागणी करण्यात आली. महापालिका एका चालकामागे या कंत्राटदारांना १४ हजार ४०० इतकी रक्कम देते. परंतु चालकांना केवळ १० हजार १०० इतकीच रक्कम पगार स्वरूपात दिले जातात. चालकांना ठोक मानधनावर ठेवल्यास महापालिकेचे पैसे वाचतील व चालकांना अधिक पगार देता येईल असे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी बैठकीत मांडले. यावर उपायुक्त अडसूळ यांनी या सूचना आयुक्तांच्या समोर मांडू असे सांगितले.

यावेळी सूरज सुर्वे, अभिजीत कांबळे, उत्तम पाटील, मोईन मोकाशी व टिपरचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.