कोल्हापूर (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,  रेमडेसिविर बाजारात आणण्यासाठी  वितरक , डॉक्टर यांचा सहभाग आहे का ?  याचा कसून शोध घ्यावा आणि संबंधितावर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने व पदवी रद्द करण्याची मागणी  जिल्हा शिवसेनेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे केली.  

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभरात कोरोनामुळे अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत.  रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मुख्यमंत्री व महाविकास आघाडी रेमडेसिवीरची इंजेक्शन्स व लसीचा पुरवठा करण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. जेणेकरुन महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा.  मात्र, काही महाभागाकडून या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन रेमडेसिविर चा काळाबाजार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे कठोर कारवाई करून संबंधित  डॉक्टरांचे परवाने रद्द करावेत.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवाजी जाधव,  मंजित माने,  हर्षल सुर्वे,  सुजित चव्हाण,  विशाल देवकुळे,  अभिजित बुकशेट,  प्रवीण पालव यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.