मुंबई (प्रतिनिधी) : ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीवर आधारित आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजच्या पहिल्या सिरीजने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. या सिरीजच्या दुसरा सिझन कधी येणार याची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता ती संपली असून एमएक्स प्लेयरने ‘समांतर २’चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर हा सिझन लवकरच रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली.

सिझन १ मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि मनोरंजक वळणावर ही कथा संपली होती. समीर विध्वंस दिग्दर्शित ‘समांतर २’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना या सिझनबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. एमएक्स प्लेअरने आता ‘समांतर २’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल? हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनल ‘समांतर २’चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे