गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या चुकीच्या कृषीविषयक धोरणांमुळे शेतकऱ्यांचे गळे घोटले जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे महाराष्ट्राचा तर ‘कब्रस्तान’ बनला आहे. आमचे आंदोलन केवळ राजकारणासाठी नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आहे, असे सांगत ‘स्वाभिमानी’ने आज (गुरुवार) दुपारी गडहिंग्लज – चंदगड मार्गावर चक्का जाम केला. स्वाभिमानीचे राज्यसचिव राजेंद्र गड्ड्यानावर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.

दुपारी बाराच्या सुमारास चंदगड मार्गावरील भडगावनजीक चन्नेकुप्पी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखला. यावेळी गड्ड्यानावर यांनी शासनाच्या कृषीविषयक चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याचे आश्वासन न पाळता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

यावेळी बसवराज मुत्नाळे, अमृत कोकितकर, पद्मिनी पिळणकर यांचीही भाषणे झाली. बसवराज बंदी, सचिन टेळी, संजय गुजर, बसवंत चनवीर, आप्पासाहेब खणगावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.