मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. अंधारे यांनी पाटील यांनाच पत्र पाठवून याबाबत कळवले आहे. त्यामुळे आता या सगळ्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, याकडे लक्ष लागले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. मात्र, या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर यांनी शाळा सुरू करताना सरकारने अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली आणि शाळा चालू केली, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. या संदर्भात पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे.

राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे. समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सत्सत विवेक प्रश्न आहे. माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती. आता यातून मी मुक्त होत आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे.