कोल्हापूर (प्रतिनिधी) : शरद पवार साहेबांवर राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करतील, असे माझे विश्लेषण आहे. ते चुकीचेही नाही. त्यांना त्यांच्या मुलीलाच मुख्यमंत्री करावे वाटणे हे चूक नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ८० तासाच्या सरकारआधी बैठकीत काय घडले होते या प्रश्नास त्यांनी बघल दिला. मी सुसंस्कृत राजकारणी आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टी कोठे सांगायचे हे मला कळते, असेही ते म्हणाले.

चंद्रकांतदादा म्हणाले की, मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचे त्यांचे कौशल्य खरोखर मोठे आहे. पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याइतका अभ्यास कुणाचा नाही. सत्ता बदलण्याचे भविष्य आम्ही वर्तवत नाही. प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतोय. पुढेही बजावू. अंतर्विरोधामुळे सरकार पडणार हे सर्वे केला तरी लोकं सांगतील. वीज बिल, शाळा उघडणे, परीक्षा यावरुन जनतेमध्ये असंतोष आहे. वीजबिलाप्रकरणात एकाचही कनेक्शन तोडले तर आम्ही तोडू देणार नाही. वीजबिलाच्या प्रकरणात तुमची चूक आहे, तुम्ही माफीबद्दल बोललात आणि आता पलटी मारत आहोत. लोकं कनेक्शन कापू देणार नाहीत.

उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न कोणते, प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धवजींनी या प्रश्नांचा अभ्यास नाही. शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उद्धवजींना मंत्रालय कुठे आहे हे ही माहित नव्हतं. कामकाज कसे होते हे माहित नाही. फडणवीस पाच वेळा आमदार, त्याआधी नगरसेवक होते. त्यांना अनुभव होता. मी पहिल्यांदा मंत्री झालो. मी रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास केला. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीही अभ्यास केला. उद्धव ठाकरे यांनीही आपला अभ्यास वाढवायला हवा.

आमच्या कुणाच्या चौकशा लावायच्या असतील तर ते खुशाल लावू शकतात. यांना घटनाच मान्य नाही असे दिसतंय. सुप्रीम कोर्टाचाही निर्णय यांना मान्य नसतो. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो चांगला आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय दिला तर तो चुकीचा, असे कसे चालेल ?  ईडी वाढीव संपत्ती आणि मनी लॉड्रिंगची चौकशी करते. आमच्या कुणाचे काही असेल तर तसे तुम्ही माध्यमात कागदपत्रे द्या. तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाहीत, हे मान्य करावे.

शिवसेनेबद्दल कटूता नाही. पण आता आम्हाला आमची ताकद पाहायची आहे. आम्हाला राष्ट्रवादीही नको आणि शिवसेनाही नको, आम्हाला आमची ताकत पाहायचीय. आमचे संघटन मजबूत झाले आहे, हे माझं मत आहे. तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तो केंद्रीय नेतृत्व घेईल. सगळ्या पक्षाच्या लोकांनी एका बंद खोलीत बसावे. काय समस्या आहेत, राजकीय, सामाजिक संस्कृती का बदलली यावर विचार व्हावा. राज्य सरकारमधील महत्वाचे लोक चंपा म्हणण्याचे समर्थन करतात हे वाईट आहे. आम्ही म्हणणार नाही पण उद्धव ठाकरेंना उठा, शरद पवारांना शपा म्हटले तर चालेल का ? असा सवालही चंद्रकांतदादांनी केला.