कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतात नावीन्यपूर्ण योजना, कल्पना मांडणाऱ्या प्रतिभावान आणि कुशल तरुण उद्योजकांची कमतरता नाही; परंतु अनेकदा त्याना आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नाही. अशा नव संकल्पना असलेल्या स्टार्टअपना १ कोटीपर्यंत गुंतवणूकदार उपलब्ध करून देण्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे सहकार्य राहील, अशी ग्वाही सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक हार्दिक जोशी यांनी दिली.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘स्टार्टअप आऊटरीच व मार्गदर्शन’ शिबिरात ते बोलत होते. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डीएसटी) आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे (सायटेक पार्क) यांच्या संयुक्त विद्यमान कोल्हापूर, सांगली, सीमा भागातील उत्पादनशील विविध क्षेत्रात कार्यरत स्टार्टअपना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ४० हून अधिक नवउद्योजक उपस्थित होते.

हार्दिक जोशी म्हणाले, उत्पादन- सेवा यासंदर्भात एखादी नवीन संकल्पना घेऊन येणारे अनेक नव उद्योजक असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य यांची आवश्यकता असते.  नवनवीन स्टार्ट सुरू व्हावेत यासाठी सायटेक पार्कच्या वतीने स्पर्धा आयोजित केली असून, यामधून उत्कृष्ट उत्पादनशील चांगले स्टार्टअप निवडले जाणार आहेत. या स्टार्टअपना ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाईल.

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, कोल्हापूर जिल्हा साखर उद्योग, कापड मिल्स आणि अभियांत्रिकी उपकरणे, फाऊंड्री, केमिकल्स अशा प्रमुख क्षेत्रातील उद्योगांद्वारे समृद्ध आहे. या क्षेत्रांचा अभ्यास करून यातील समस्या जाणून घेतल्यास अनेक स्टार्टअप सुरु होऊ शकतात. आ. सतेज पाटील आणि आ. ऋतुराज संजय पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्याला ‘ब्रँड कोल्हापूर’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नवीन स्टार्टअपला संधी देण्यात येत असून, आजच्या शिबिरातून त्याची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमरसिंह जाधव, स्किल डेव्हलपमेंटचे कोल्हापूर सहायक आयुक्त एस. के. माळी, प्रा. सूर्यकांत दोडमिसे, गोरख माळी, शीतल केटकाळे, चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे यांनी केले.