सुधागड – नांदगाव : माझ्या काबाडकष्ट करणार्‍या लोकांच्या घराघरात नळाद्वारे पाणी गेले पाहिजे असा विचार करणारे, शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आले पाहिजे. सुगीचे दिवस आले पाहिजेत. यासाठी थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आणि त्यांना उन्नतीकडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी नांदगाव येथे काढले.

या रायगड लोकसभा मतदारसंघात माझा संपर्क गेल्या ४० वर्षाचा आहे. अनंत गीते यांच्यासारखा एका दिवसाचा नाही असा टोला लगावतानाच लोकांच्या भावनांची जाणीव नसलेले अनंत गीते निवडणूक लढवत असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच नांदगावमधील सभेला जमलेला जनसमुदाय बघून अलिबागच्या जयंत पाटील यांचा एकेकाळी असलेला प्रभाव आता राहिला नाही हे सिध्द होत आहे, अशी टिप्पणीही सुनिल तटकरे यांनी केली.

या निवडणुकीत जातपात बघून निवडणूक होत नाही. या देशाची काळजी करतो तो पंतप्रधान झाला पाहिजे. यादृष्टीने निवडणुक होत असते असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे,भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,शिवसेना संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, सुधाकर घारे आदींसह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.