शिरोळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घ्यावा, असे आवाहन राजाराम विद्यालय नंबर २ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले.

शिरोळ येथील राजाराम विद्यालयात इयत्ता पहिली आणि चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे अभिजीत माने, माजी उपनगराध्यक्षा करुणा कांबळे, डॉ. अतुल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली आणि पाचवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका निता चव्हाण, शिक्षिका सुनंदा पाटील, सनी सुतार यांनी पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यात येणारे शिक्षण आणिभौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शितल जगदाळे सदस्य प्रियंका इंगळे, मारुती जाधव, दत्तात्रय पुजारी, त्रिशला येळगुडे, मीनाक्षी हेगाण्णा, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.