सातारा : महायुतीचा सातारा लोकसभा जागेचा तिढा सुटला असून उदयनराजे हेच उमेदवार असणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. यातच सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे आता सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

सातारा लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. तर शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणावरुन श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. श्रीनिवास पाटील यांचा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असा देखील प्रस्ताव होता.
आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, हा पेच शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिल्यास त्यांचं काम करु अन्यथा शरद पवारांनी इथून उभं राहावं अशी मागणी केली आहे.

शरद पवार सातारा दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी माढा आणि साताऱ्याचे उमेदवार आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित झालं होतं. अशातच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. तर वय झाल्यामुळे ते निवडणूक लढणार नाहीत, अशी साताऱ्यात चर्चा होती. त्यावर पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण अशातच आता श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता साताऱ्यातून कोण? हा प्रश्नच सर्वांना पडला आहे.