कोल्हापूर (सरदार करले) : आशिया खंडातील सर्वांत मोठा सहकारी संघ, प्रचंड विश्वासार्हता असलेल्या शेतकरी सहकारी संघात संचालकांचे राजीनामे, प्रशासक नियुक्ती होण्याची शक्यता अशा बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. ‘बैल’ हे या संघाचे बोधचिन्ह होते. एके काळी सुदृढ असलेला हा ‘बैल’ सध्या कायमचाच बसण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वसामान्य शेतकरी डोळ्यांंसमोर ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संघाला ही अवकळा का आली ? संघाचा इतिहास काय आहे, संघाला कोण वाचवणार असे अनेक प्रश्न संघाच्या सभासदांना पडले आहेत.

२३ ऑक्टोबर १९३९ रोजी संघाची स्थापना झाली. तत्पूर्वी कदमवाडी येथे झालेल्या रयत सभेच्या अधिवेशनात शेतकरी सहकारी खरेदी – विक्री संघ स्थापन करण्याचा ठराव झाला. रावसाहेब पी. ए. रावराणे या संकल्पनेचे प्रवर्तक होते. त्यांच्या या संकल्पाला त्या वेळचे खऱ्या अर्थाने समाजसेवक असलेले रावसाहेब डी. आर. भोसले, ग. गो. जाधव, डॉ. व्ही. टी. पाटील, तोडकर वकील, गारगोटीचे व्ही. डी. देसाई (काका) आदींनी पाठबळ दिले.

त्या काळात शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून धान्य, हळद, मिरची, ऊस, तंबाखू पिकवीत. उत्तम प्रकारचा गूळ तयार करीत. माल खासगी व्यापाऱ्यांकडे पाठवला जात असे. अडत दुकानात माल आणून टाकला की त्याचा दाम ठरवण्याचा अधिकारही शेतकऱ्यांना नव्हता. व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करत. स्वार्थी व्यापाऱ्यांना आपण शेतकऱ्यांना लुटतो आहोत याची खंतही वाटत नसे. शेतकरी जगला काय किंवा मेला काय याची चिंता त्यांना नव्हती. शेतकऱ्यांना न्याय देणारे कोणीच नव्हते. केवळ न्याय देण्याच्या उदात्त हेतूने शेतकरी संघाची स्थापना झाली. त्यामुळे या जुलमी व्यवस्थेला कायमची मूठमाती मिळेल, अशी अपेक्षा होती.

काही काळ शेतकऱ्यांच्या उत्पादनाला संरक्षण मिळाले. मालाला वाजवी भावही मिळाला. संघाची स्थापना म्हणजे इतकी सहज सोपी वाट नव्हती. त्यासाठी अनेक खटाटोप करावे लागले. संघाचा सर्व व्यवहार चोख व पारदर्शी असावा याचा कटाक्ष होता. रावसाहेब पी. ए. राणे मामलेदार होते. त्यांनी मिळणाऱ्या सरकारी वेतनातून पदरमोड करून कारभार केला. सुरुवातीस २१३ सभासद होते. खेळते भांडवल २५ हजार ५२२ रुपये होते. नंतरच्या दोन-तीन वर्षांच्या काळात सभासद संख्या ५८० झाली. त्या वेळी भागभांडवल ५८ हजार ७९१ इतके झाले. संघ ज्या वेळी अत्युच्च शिखरावर होतो तेव्हा सभासद संख्या ४३ हजार इतकी होती. ग्रामीण भागातील बहुतेक प्रत्येक घर संघाशी जोडले होते. शेतकरी संघाच्या शेअर्सचे फोटो घराघरात दिमाखात आणि अभिमानाने लावलेले असत.

त्या काळात रावसाहेब पी. ए. राणे संघाचे अध्यक्ष, तर कार्यकारी संचालक अॅड. तोडकर होते. तोडकर यांना ४० रुपये मानधन होते. त्या वेळी इतरांना २०, १८ आणि १२ रुपये पगार मिळत असे. त्या काळात सहकार क्षेत्रात तात्यासाहेब मोहिते यांनी नावलौकिक संपादन केला होता.  राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिते यांच्यावर कार्यकारी संचालक म्हणून संघाची जबाबदारी किंवा सूत्रे विचारपूर्वक सोपवली. अध्यक्ष म्हणून गारगोटीचे व्ही. डी. देसाई (काका) यांना सूत्रे दिली. त्यानंतर संघाची तुफान मेल सुसाट धावायला लागली.

तात्यासाहेब मोहिते राणेसाहेबांना ‘तुम्ही संघाची आई आहात’ असे नेहमी म्हणत. राणे यांनी बीज रोवले, त्याचा विशाल वृक्ष झाला. त्यानंतर त्या काळात बी. एससी अॅग्री झालेले बाबा नेसरीकर यांनी धुरा सांभाळली आणि आशिया खंडातील सर्वांत मोठा सहकारी संघ असा नावलौकिक संघाने मिळवला. १९६४ ते १९८५ हा काळ संघाचा सुवर्णकाळ होता. प्रचंड विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवली होती. संघाचे बोधचिन्ह असलेला बैल सुदृढ झाला होता.

(क्रमशः)