कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी (ललिता पंचमी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आणि त्र्यंबोली भेट म्हणजे कोहळा फोडण्याचा कार्यक्रम पार पडलाय. दरवर्षी लवाजम्यात भाविकांच्या गर्दीत पार पडणारा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र साधेपणाने पार पडला.

आज सकाळी तोफेची सलामी झाल्यानंतर अंबाबाईची पालखी पायघड्यांवरुन त्र्यंबोलीच्या भेटीसाठी बाहेर पडली. दरम्यान कमानीतून पालखी सजवलेल्या वाहनातून त्र्यंबोलीच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. या वेळी दरवर्षीप्रमाणं शाहू मिल, टाकाळा इथं पालखी थांबून पूजन करण्यात आलंय. त्यानंतर पालखी गेटमधून पायघड्यांवरून त्र्यंबोलीच्या भेटीस गेली. या वेळी युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते कुमारिका कोहळ्याचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर बावड्याच्या गावकामगारांच्या हस्ते कोहळा फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..

या वेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी, सुयश पाटील यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, मानकरी उपस्थित होते.