कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा स्टँड परिसरातील धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेने आज (शुक्रवार) चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. याबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.

या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी महापालिका प्रशासकांना रात्रीच्या सुमारास  आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा साठा शिल्लक असताना ते संपले असल्याचा फोन केला. याबाबत प्रशासक बलकवडे यांनी उपायुक्त निखील मोरे यांना या तक्रारीबाबत शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत उपायुक्तांनी या हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराशी संपर्क साधला असता त्याने आज या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा केली असल्याचे सांगितले.

यावेळी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, अग्निशमन विभागाचे मनीष रणभिसे यांनी या हॉस्पिटलला रात्री भेट दिली. यावेळी त्यांना या हॉस्पिटलमध्ये सिलेंडरच्या दहा टाक्या भरल्याचे आढळून आले. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या टाक्या शिल्लक असतानाही डॉक्टरांनी चुकीची आणि खोटी माहिती दिल्यामुळे या हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.