कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा दुध संघाने गाय दुध दरात कपात केल्याचा निर्णय घेतला आहे. याला दुध उत्पादकांचा विरोध असून, तातडीने दूध दरवाढ द्यावी अशी मागणी दुध उत्पादक करत आहेत. या पार्श्वभूमीवर गोकूळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी याबाबत भाष्य केले असून मी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


याबाबत महाडिक यांनी एक परिपत्रक काढलं असून, यात त्यांनी म्हटले आहे की, मागचे 15 दिवस गोकुळच्या दूध उत्पादकांचे दरासाठी आंदोलन सुरु आहे. कित्येक दूध उत्पादकांनी मला वैयक्तिक फोन करून आंदोलनात सहभागी होण्यासाठी वेळोवेळी विनंती केली.

तरीही मी मौन बाळगलं, मात्र मौन म्हणजे सहमती असा अर्थ कोणीही घेऊ नये. हे मौन बाळगण्याचं कारण काय होतं ? या प्रकरणात नेमकी माझी भूमिका काय ? याबाबत जे सत्य आहे ते उद्या जनतेसमोर निश्चितपणे मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या.

तुर्तास मी इतकंच सांगते की, उद्या होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत गाय दूध दरवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यावा.. नंतर खोटी कारणं दिली जातात त्यामुळे आजच मी सर्व दूध उत्पादकांना सांगू इच्छिते, मी उद्याच्या बैठकीत निश्चितपणे आपली बाजू मांडेन आणि जर दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय नाही झाला तर संचालकपदाचा कसलाही विचार न करता दरवाढीसाठी आपल्यासोबत रस्त्यावर उतरेन असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.