सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखांची रोख रक्कम, चार चाकी जप्त केली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) सकाळी ११.३० सुमारास करण्यात आली आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीमध्ये १० लाखांची रक्कम आढळून आली. उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तडवी यांनी पुढील कार्यवाही करता एसएसटी पथक प्रमुख यांच्या ताब्यात दिली आहे. त्याच्यावर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे.

यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, बाणे, कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथी हे उपस्थित होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. पोलीस व स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली. मात्र, ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली ? कोणी आणली ? कुठे घेऊन जाण्यात येत होती ? याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.