कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज (मंगळवार) जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटीलेटर सुपूर्त करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या व्हेंटीलेटरचा स्वीकार केला.

तात्पुरत्या स्वरुपात शहरातील सीपीआर, इचलकरंजीतील आय.जी.एम, गडहिंग्लज येथील एस.डी.एच रुग्णालयाकडे हे व्हेंटीलेटर सुपूर्त करण्यात येणार असून गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात याचा वापर करण्यात येणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, संजय पवार, मुरलीधर जाधव, अजित नरके यांच्यासह सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पीपीई किटचे वितरण करण्यात आले. यावेळी सेना पदाधिकारी मनजित माने व सहकारी उपस्थित होते.