कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट सर्वत्र असतानाच हॉस्पिटल्सकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या मास्क, ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरच्या अवाजवी किमतीतून सर्वसामान्य नागरिकांना लुबाडले जात आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. यासह शासकीय योजनांचा लाभ घेऊनही खाजगी रुग्णालयांकडून कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांची होणारी आर्थिक लूट, या आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे शिष्ठमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.
याशिवाय जिल्हापरिषदेच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरवासियांना रेमिडीसीवर इंजेक्शनची उपलब्धता करून देणे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ कोल्हापूर महानगर पालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेणार आहे. याअनुषंगाने उद्या (सोमवार) २८ सप्टेंबर २०२० रोजी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.