मंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चिट मिळणार असून पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांनी या घोटाळ्याचा एसआयटीमार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी एसआयटीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सादर करण्यात आली. परंतु, या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. परंतु, दुसऱ्या खंडपीठासमोर याचिकाकर्ते दाद मागू शकतात, असे निर्देश याचिकाकर्त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, एप्रिल महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला होती. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँकेत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा या रिपोर्टमधून दावा करण्यात आला. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी कथित संबंध असलेल्या व्यवहारांमध्ये कोणताही फौजदारी गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँकेला कोणताही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत 1343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचे क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. पण आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी नव्याने मागणी करण्यात आली आहे.