मुंबई ( वृत्तसंस्था ) दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कास्ट सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार यांची ओबीसी कुणबी अशी वर्णी लागली आहे. त्यानंतर हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी शरद पवार यांचे शाळा सोडल्याचा दाखला सादर करताना त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा ही जात लिहिल्याचा दावा केला.


शरद पवारांनी कधीच कुणबी जातीचा दाखला दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. एवढ्या मोठ्या नेत्याची बदनामी करण्यासाठी काही लोकांकडून संभ्रम पसरवला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पासलकर यांनी कोणाचेही नाव न घेता, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या ‘नागपूर केंद्रा’कडून हा सगळा कट रचला जात असल्याचा आरोप केला. मात्र दोन समाजांना चिथावणी देऊन राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण केला जात आहे.

हा सगळा विरोधकांचा बालिशपणा असल्याचं शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांनी ज्या वेळी अभ्यास केला, त्या वेळी सर्व प्रमाणपत्रे मराठीत बनवल्याचे त्यांनी सांगितले. व्हायरल होत असलेले बनावट प्रमाणपत्र इंग्रजीत आहे. यावरून हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे दिसून येते.