मुंबई : जागतिक बाजारातील नरमाई आणि मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक दरवाढीतून बळावलेल्या आर्थिक मंदीच्या शक्यतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी केलेल्या विक्रीच्या ताणाने निर्देशांकांनी पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदविली.

मुंबई निर्देशांक ‘सेन्सेक्स’ एके प्रसंगी तर मंगळवारच्या तुलनेत १,००० अंश खाली गडगडला होता. पुढे तो काहीसा सावरला तरी ७७०.४८ अंश अर्थात १.२९ टक्क्यांच्या घसरणीसह ५८,७६६.५९ वर स्थिरावला. त्याचप्रमाणे, व्यापक प्रतिनिधित्व असणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २१६.५० अंशांनी (१.२२ टक्क्यांनी) घसरून १७,५४२.८० वर बंद झाला. सरकारने ‘विंडफॉल’ करात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारातील अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीज समभाग गडगडला. सेन्सेक्सच्या घसरणीमध्ये रिलायन्समधील २.९९ टक्क्यांच्या घसरणीचा सर्वात मोठा वाटा राहिला. त्यापाठोपाठ टीसीएस, सन फार्मा, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, एनटीपीसी आणि टाटा स्टील हे समभागही घसरले.  सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभाग घसरणीसह बंद झाले. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत १३.५ टक्क्यांनी वाढ झाली. गत चार तिमाहीतील सर्वात वेगवान वाढ नोंदवणारी अधिकृत आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध झाली. तरी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजापेक्षा विकासदरात वाढीचा वेग कमी राहिला आहे.