कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गांधी मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शिवाजी पेठेतील क्रीडा प्रेमींच्या संतापाची लाट पसरली आहे. गांधी मैदानाच्या पश्चिम बाजूने जाणारे चॅनेल पुढे अपना बँकेसमोर बोळात तुंबले असल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले तीन दिवस मोरी विभागाचे कर्मचारी दहा ते अकरा तास काम करूनही ही समस्या संपलेली नाही.

यावेळी आरोग्य विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दोन खड्डे मारले आणि साधारण पाच फूट रुंद आणि दहा फूट लांब असा सहा फूट खोलीचा चर मारला. त्यावेळी हा प्रकार  एका चेंबरमूळे झाल्याचे समोर आले आहे. हा चेंबर बांधताना मूळ बांधकामाचे काही दगड आतच पडले होते. तसेच बांधकामाला आतल्या बाजूने लावलेल्या फळ्या तशाच ठेवलेल्या होत्या. यामुळे पाण्याचा प्रवाह खंडित होऊन पाणी रस्त्यावर वाहू लागले आणि तीव्र उतारामुळे नागरिकांच्या घरातही पाणी शिरले.

इतके सगळे होत असताना उपशहर अभियंत्यांनी केवळ धावती भेट दिली. तर शहर अभियंता वारंवार सांगूनही त्याठिकाणी आले नाहीत. आज पाण्याच्या प्रवाहामुळे आणि जेसीबीच्या धक्क्यांमुळे लगतच्या एका घराच्या भिंतीला मोठा तडा गेला आणि ती ढासळण्याच्या स्थितीत आली. त्यावेळी सकाळपासून सातत्याने शहर अभियंत्यांशी संपर्क साधल्यावर दुपारी तीन वाजता पुन्हा उपशहर अभियंता जागेवर आले आणि त्यांनी आम्हाला न विचारता काम का केले असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांना केला. त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक अजित ठाणेकर व नागरिकांची जोरदार वादावादी झाली.

त्यातून उपशहर अभियंत्यांना आरोग्य विभागातील मोरी विभाग आणि ड्रेनेज विभाग स्वतंत्र असतात याचीही माहिती नसल्याचे समोर आल्याने नागरिकांनी त्यांना धारेवर धरले. त्यांनी चेंबरचे बांधकाम निकृष्ट झाल्याचेही न मान्य करता आरोग्य खात्यानेच पुढचे काम करून घ्यावे असे सांगितले. ज्या उपशहर अभियंत्यांकडे नाले, गटर्स आदि सुविधा निर्माण करण्याची आणि दुरुस्तीची जबाबदारी असते ते उपशहर अभियंत्यांना आशा पद्धतीने बोलताना पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोरी विभागाचे कर्मचारी छाती इतक्या पाण्यात उतरून काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सहज फेरी मारल्यासारखे येऊन गेले. समस्येचे गांभीर्य लक्षात न घेता त्याकडे दुर्लक्ष केले. निकृष्ट कामाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आरोग्य विभागालाच काम का केले म्हणून जाब विचारला हे अत्यंत निषेधार्ह आहे. जर उपशहर अभियंता सारख्या जबाबदार व्यक्तीला महानगरपालिकेचा कुठला विभाग कुठले काम करतो हे माहिती नसेल तर ती व्यक्ती त्या पदावर रहाण्यास पात्र नाही.

त्यामुळे येत्या दोन दिवसात चेंबरचे बांधकाम सुरू झाले नाही, तर ज्या नागरिकांना अपरिमित त्रास सहन करावा लागला आहे. त्या नागरिकांसह नाल्याच्या वाहत्या पाण्यात उभारून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक अजित ठाणेकर यांनी दिला आहे.