लाईव्ह मराठी विशेष ( सुमित तांबेकर ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणूकीचं वारं वेग धरु लागलं आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट ताकद आजमावत आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी कोणाला यावर खलबतांना वेग आला आहे. असं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीची विभागणी झाल्याने कार्यकर्त्यांचीही विभागणी झाली आहे. परिणामी कोल्हापूरच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांच्या रुपाने काँग्रेसने मात्र आपली बाजू भक्कम केली आहे.

गत लोकसभा, विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांसोबत सतेज पाटील यांनी हात मिळवणी करत आपली गोळा बेरीज केली होती. यावेळी मात्र महायुतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारखे दिग्गज नेते एकत्र लढणार आहेत.

तर महाविकास आघाडीतून आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आमदार पी. एन पाटील, राजू बाबा आवळे जयंत आसगावकर,जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांच्या खेरीज जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेला चेहरा सध्याच्या घडीला दिसत नाही. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांना पी. एन पाटील यांच्या शिवाय ताज्या दमाच्या नेते अन् कार्यकर्त्यांना एकत्र करत लोकसभा, विधानसभेची खिंड लढवावी लागणार हे अटळ आहे.

सतेज पाटील यांची ही लढत एकाकी ठरणार असली तरी, सध्या जिल्ह्यातील काँग्रेसचं वर्चस्व तसेच राजकीय कोलांड उडीला वैतागलेला नागरिकांचा कल पाहता सतेज पाटील यांच्यासाठी काहीसं वातावरण पोषक आहे. मात्र ही लढाई सोपी नाही…! कारण कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वर्षे वर्चस्व असणारे अनेक मातब्बर नेते महाविकास आघाडीविरोधात शड्डू ठोकणार आहेत.

त्यामुळे या निवडणूकांमध्ये सतेज पाटील यांनी आपल्या बाजून निकाल खेचून आणल्यास ही लढाई निर्णायक ठरणार यात शंका नाही. एकूणच हे आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकांच्या निकालावरुच स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी सतेज पाटील यांना मात्र निवडणूकीची अग्नि परिक्षा द्यावी लागणार आहे हे निश्चित..!