टोप (प्रतिनिधी) : शिये फाटा येथे डंपरची अॅक्टीव्हा मोपेडला धडक बसून पेठ वडगाव कोर्टातील स्टेनो महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल (बुधवार) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्यासुमारास शिये फाटा येथे घडला. ही महिला कोर्टातील कामकाज उरकून सुट्टी झाल्यावर घरी जात होती. वैशाली अजित पोळ (वय २८, रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) असे या मृत महिलेचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वैशाली पोळ पेठ वडगांव इथल्या कोर्टात स्टेनो म्हणून काम करीत होत्या. काल सायंकाळी सहा वाजता कोर्टातील कामकाज उरकून त्या आपल्या अॅक्टीव्हा मोपेड क्र. (एमएच 09 ईएन 8158) वरुन त्या घरी जात होत्या. त्यावेळी शिये फाटा येथे आल्यावर डंपरने वैशालीच्या मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ती रस्त्यावर पडली. त्यानंतर डंपरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

या अपघाताने शिये फाटा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे वडापावचे आणि आईस्क्रीमचे गाडे बंद करून व्यापाऱ्यांनी पळ काढला.यावेळी पोलीस हवालदार समिर मुल्ला, नजीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनानुसार परिसरातील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेच तपासले. त्यामध्ये डंपरने धडक दिल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. पण डंपरचा नंबर मात्र अस्पष्ट दिसत आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.