अहमदनगर : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपापल्या उमेदवारांसाठी नेते प्रचारसभाही घेत आहेत. यावेळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी नेते सोडत नाहीत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांचावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4 जूननंतर एकतर तुरुंगात असतील, नाहीत तडीपार होतील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधतान संजय राऊत बोलत होते.यावेळी राऊत म्हणाले, मी सांगतो या राज्याचा मुख्यमंत्री आहे ना, शिंदे तो देखील 4 जूननंतर तुरुंगात जाईल किंवा तडीपार होईल. त्याला मोदी-शहा पण वाचवू शकणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आली आहे. यावर बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4 जूननंतर तुरुंगात असतील, असा मोठा दावा केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावं हे मोठं आश्चर्य आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी आमच्या नेत्यांना तडीपारीची नोटीस बजावली जात आहे. 4 जूननंतर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना एकतर तुरुंगात नाहीतर तडीपारीची नोटीस येईल. माझ्याकडून लिहून घ्या. त्यावेळी त्यांनी मोदी-शहा पण वाचवू शकणार नाहीत, असा दावा करताना त्यांनी इशाराही दिला आहे.

पंतप्रधान मोदींवर उपचार करण्याची गरज
पंतप्रधान मोदी यांनी विकासावर बोलायला हवं. विकसित भारत कसा तयार करता येईल, यावर बोलण्याची अपेक्षा आहे. मात्र, ते केवळ टीका करण्यात व्यग्र आहेत. मोदींची गाड आता पूर्णपणे घसरली आहे. ते त्यांच्या मनाला वाटेल ते बोलत आहेत. त्यामुळेच त्यांची प्रकृती बरी नसल्याचं दिसत आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना प्रचारातून बाजूला करुन त्यांच्यावर उपाचर करण्याची गरज असल्याचं, म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.