कोल्हापूर (प्रतिनिधी) : झी मराठीचा सारेगमप हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे. सारेगमपचा हा प्रतिष्ठित मंच गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने तमाम संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.  

सारेगमपच्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्सचा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ देणारे कमलेश भडकमकर आणि त्यांच्या वादक मित्रांची. निलेश परब यांची ढोलकी, अमर ओक यांची बासरी, अर्चिस लेलेंचा तबला, सत्यजित प्रभू यांचा सिंथेसायजर, या मंडळींनी ही वाद्य वाजवायला घेतली की कानसेनांच्या कान तृप्त व्हायचे,

या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाण्याची संधी या पंचरत्नांना मिळाली. या पंचरत्नांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकता मिळवली. आता नवीन पिढीतून काही उमद्या गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास १२ वर्षांनी सारेगमप लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यावेळी स्पर्धेत परिक्षक नसून ज्युरी असणार आहेत,  हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत, हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करणार आहेत. या पर्वाचे नावीन्य म्हणजे यामध्ये कोणतही एलिमिनेशन होणार नाही, छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. एलिमिनेशन नसलं तरी या गायकांना आपले गाणे रसिकांपर्यंत  पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही. ही बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचं मोठं स्वप्न साकारण्यासाठी झी मराठी आणि सारेगमपचा मंच सज्ज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी देखील आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर केले असून त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. त्यांच्या या पोस्टर्सवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.