विशेष प्रतिनिधी ( बेळगाव ) लोकसभा निवडणुकीची घाई सुरु झाली आहे. भाजपने अबकी बार 400 पार चा नारा दिला आणि सर्वच मतदारसंघात उमेदवार कोण द्यावा याची चाचपणी सुरु केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातही पक्षाने काँग्रेस उमेदवाराला तोडीस तोड टक्कर देण्याचा आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार कोण हे अद्याप ठरले नाही तसेच भाजपचीही सध्या चाचपणीच सुरु असली तरी लोकसभेच्या रिंगणात बेळगावात भाजपचा आवाज माजी आमदार संजय पाटील बनणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


ही चर्चा सुरु झाली ती मराठा कार्यकर्त्यांनी भाजपकडे केलेल्या मागणीने. संजय पाटील हे मराठी आणि कन्नड भाषिकांना समन्वय साधून सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी द्या. अशी ही मागणी पक्षाच्या वरिष्ठांना विचार करायला लावणारी आहे. आजवर या मतदारसंघाने कन्नड भाषिक माणसाला खासदार केले आहे.

यात निर्णायक मराठी भाषिक मतदारांनी मोठी भूमिका निभावली आहे. काँग्रेस असो वा भाजप दोन्ही पक्षांनी उमेदवार कन्नड आणि लिंगायत असण्यावर भर दिला. माजी खासदार अमरसिंग पाटील हे एकटेच त्याला अपवाद ठरले. मात्र यावेळी हेच लिंगायत कार्ड खेळण्यापेक्षा संजय पाटील या मराठी आणि कन्नडचा संगम साधणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिले तर भाजपचा फायदा होईल असे वातावरण तयार झाले आहे.


भाजपमध्ये यावेळीही इच्छूकांची भाऊगर्दी झाली आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी या पोटनिवडणुकीत खासदार बनल्या. आपसूक त्या शर्यतीत पहिल्या आहेत. त्यांची कन्या आणि काँग्रेसला जाऊन परतलेले भाजप नेते जगदिश शेट्टर यांची स्नुषा श्रद्धा शेट्टर यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न होताहेत. मात्र घराणेशाहीला विरोध करणाऱ्या पक्षात यावेळी या प्रयत्नांना महत्व दिले जात नसल्याचे दिसत आहे. इतर अनेकजण सध्या खासदार होण्याचे स्वप्न बघत आहेत.

त्यामध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून ओळखीचे असलेले महांतेश कवटगीमठ आणि विविध सरकार नियुक्त पदे भोगलेले शंकरगौडा पाटील हे ही सहभागी आहेत. मात्र पक्षाने घेतलेल्या आढाव्यात भाजप मजबूत करण्याच्या बाबतीत महत्वाची भूमिका निभावत असलेले हिंदुत्ववादी नाव म्हणून संजय पाटील यांना पहिले प्राधान्य मिळणार असल्याचे वातावरण आहे.


बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे सलग दोनवेळा आमदार झालेल्या संजय पाटील यांनी मराठी आणि कन्नड भाषिकांना एकत्र घेऊन विकासाची वाट चोखाळली आहे. यामुळे यावेळी त्यांना खासदारकीची संधी देण्याच्या बाबतीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी नियोजन सुरु केले असल्याची माहिती मिळत असून त्याद्वारे एक नवा सर्वसमावेशक चेहरा या निवडणुकीत आपली वेगळी छाप पाडवणार असे चित्र पाहावयास मिळते.