मुंबई (प्रतिनिधी) : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने ११ वर्षापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती. सध्या रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग नाही, तो सध्या विश्रांती घेत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका सुरु असताना रोहित शर्माचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने सूर्यकुमार यादवबाबत ११ वर्षांपूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती जी आता सत्यात उतरताना दिसत आहे. २०११ मध्ये त्याने सूर्यकुमारचे कौतुक करणारे ट्विट केले होते. या मध्ये त्यांने मुंबईचा सूर्यकुमार यादव हा भविष्यात चांगला खेळ दाखवेल असे म्हटले होते. त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादव सध्या टी-२० क्रिकेटमध्ये धुवाँधार धावा करताना दिसत आहे. त्यामुळे रोहितची भविष्यवाणी आता खरी ठरत आहे असे अनेकांचे मत आहे.