औरंगाबाद (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांनी देशात आणि महाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात शाळा सुरु केल्या. यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा आहे, त्याबद्दल कुणी शंका उपस्थित करण्याचे कारणच नाही, अशी स्पष्टोक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ते औरंगाबाद इथे बोलत होते.

ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या शिक्षण प्रसार चळवळीत महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणासाठी मूठभर धान्य ही चळवळ वाड्यावस्त्यांवर फिरुन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी यशस्वी केली. या चळवळीचा शुभारंभ त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेर्ले इथे मूठभर धान्य मागून केला होता.

या संदर्भानेच महापुरुषांनी महाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि शाळा सुरु करण्यासाठी उपसलेल्या अतोनात कष्टाविषयी मी पैठण येथील कार्यक्रमात बोललो. माझ्या आदर आणि श्रद्धेच्या भावनांचा गैरअर्थ लावून कुणीही राजकारण करु नये, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.