कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल शहरातील सर्व अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी अधिकार्‍यांनी युद्ध पातळीवर कार्यवाही करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने या झोपडपट्ट्यातील अतिक्रमणे नियमितीकरण, कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचा आढावा व बेघर वसाहतीतील प्रॉपर्टी कार्ड या कागल शहरातील जिव्हाळ्याच्या विषयावर महत्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, मुख्याधिकारी टीना गवळी, नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, पुष्पा परिट, संतोष कणसे, नवनाथ डवरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरी २०२२ या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत ठोस कार्यक्रम आखला आहे. या नागरिकांच्या नावावर त्वरित घरे होऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी शासकीय पातळीवरील प्रस्ताव अधिकाऱ्यांनी पाठवावेत. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा संबंधित विभागाकडे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल शहरात आठ वसाहतींमधील एकूण अतिक्रमित घरे ३६१ व बेघर वसाहत एकूण घरे ३६९ हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. यापैकी काही जागा या आमच्या घाटगे घराण्याने या नागरिकांना दिल्या आहेत. या नागरिकांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड होऊन आवश्यक त्या सुविधा देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

सत्तांतरानंतरच्या शिंदे-फडणवीस सरकारने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे निकष आणखी शिथिल करण्याचे धोरण ठेवले आहे. पात्र माणूस वंचित राहणार नाही, यासाठी लालफितीत अधिकाऱ्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत  त्यांना अडकवू नये, असे आदेश मंत्री पाटील यांनी जिल्हाध्यक्ष घाटगे यांच्या सूचनेवर अधिकाऱ्यांना दिले.