कोल्हापूर (प्रतिनिधी) : टीईटी परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी (दि.२१) झालेल्या  टीईटी परीक्षेला केवळ २ मिनिटे उशीर झाला म्हणून परीक्षार्थींना प्रवेश दिला नाही.  त्यामुळे शहरातील अनेक  महाविद्यालयावर  गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. तर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर चुकीचा पत्ता टाकल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा  केंद्र शोधताना धावाधाव करावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता आले नाही. तरी या कारणास्तव परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. अन्यथा युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजीत माने, उपशहर प्रमुख वैभव जाधव, कुणाल शिंदे, विभागप्रमुख मंगेश चितारे, अभिजीत कराडे, उदय चौगुले, विद्यार्थी आदी उपस्थित होते.