शिरोळ ( प्रतिनिधी ) लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं गेलं असून, राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत चाचपणी केली असली तरी आतापर्यंत एकला चलो रे ची त्यांची भुमिका कायम आहे. यापार्श्वभूमीवर आज शेट्टी यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा पाठिंबा मिळावा, यासाठी साद घातली आहे. गद्दारांना धडा शिकवायचा असेल, तर मला पाठिंबा द्यावा अशी साद राजू शेट्टी यांनी ठाकरे यांना घातली आहे. तसेच शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी मदत होईल असं ही म्हटलं आहे.

एकला चलो रे ची भुमिका कायम..!

राजू शेट्टी यांनी उद्धवसेनेचा जाहीरपणे पाठिंबा मागितला असला, तरी महाविकास आघाडीशीवाय लढण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. तसेच उद्धवसेनेबाबत बोलताना ते म्हणाले की उद्धवसेनेबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. त्यामुळे आम्ही पाठिंबा मागत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यावेळी विकासकामांवरून धैर्यशील माने यांनी होर्डिंग लावली होती. मात्र, आता किती होर्डिंग शिल्लक आहेत ते जाऊन बघावीत असा टोला त्यांनी धैर्यशील माने यांना लगावला.