कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत आहे. यास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तातडीची बैठक घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज (शुक्रवार) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, जिल्ह्यातील काही रुग्णालयात आवश्यकता नसणाऱ्या रुग्णांनाही रेमडीसीवर इंजेक्शन देण्यात येत आहे. हे या तुटवड्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन देण्यात यावे. काही विघ्नसंतोषींकडून या इंजेक्शनची विक्री अवाढव्य किमतीला करून रुग्णांची व नातेवाइकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. हे प्रकार रोखावेत. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये, म. फुले जनआरोग्य योजनेंतर्गत येणारी रुग्णालये यांची तातडीची बैठक घेऊन, रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा व काळाबाजार यास आळा घालण्यासाठी सूचना प्रशासनाने द्याव्यात.

रोज हजारांच्या संख्येत रुग्णांची वाढ होत आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जाऊ नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने जबाबदारी घेऊन दसरा चौक येथे स्वतंत्र तपासणी केंद्र उभे करावे. टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीस दिलेल्या पाच एकर जागेत उभ्या असलेल्या इमारतीमध्ये महापालिका प्रशासनाकडून जंबो कोविड सेंटर उभारण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचना केली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रेमडीसीवर इंजेक्शन संदर्भात तातडीने जिल्ह्यातील रुग्णालयांची बैठक आयोजित करण्याची सूचना मान्य केली. यासह इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही क्षीरसागर यांना केली. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचेशी संपर्क साधला असून, ते लवकरच जिल्ह्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असे सांगितले.