मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. गुढीपाढव्याला जाहीर सभेत राज ठाकरे यांनी महायुतीत जाण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेते त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. सोबतच त्यांचा हा निर्णय मनसैनिकांना सुद्धा काही खास रुचलेला दिसत नाही. मनसेच्या कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. अशातच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय जाहीर होऊ शकतात

एमआयजी कल्बमध्ये या बैठकीचं आयोजन केलं आहे. यावेळी राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच या बैठकीला बोलावलं आहे. मनसे नेते अविनाश अभ्य्यांकर, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. मात्र, मोदींसाठी राज ठाकरे सभा घेणार की नाही? कार्यकर्त्यांनी प्रचारात जायचं की नाही? जायचं तर कुणी जायचं? प्रचारातील मनसेची भूमिका काय असेल? आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे मोदींसाठी महायुतीच्या व्यासपीठावर जाऊन निर्णय घेणार की नाही? याबाबतचा निर्णय आज होऊ शकतो. तसेच या बैठकीत राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना समजुत काढणार का ? यामुळेही बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं राहील आहे