पुणे (प्रतिनिधी) : मान्सून कोकणात दाखल झाला असून, पुढील दोन दिवसात हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. संध्याकाळच्या सुमारास पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

दिवसभर पुणे शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता. सकाळी स्वच्छ उन पडले होते. तापमानही जास्त जाणवत होते; पण दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळलेले वातावरण तयार झाले. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, कोल्हापूर शहरात देखील आकाशात काही काळे काळ जमा झाले होते. मृग नक्षत्र निघून तीन दिवस झाले तरी वरुणराजा बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत.