मुंबई (प्रतिनिधी) : ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन म्हणजेच एटीव्हीएम मशिन्स सुरु करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास क्रिस या रेल्वेच्या संस्थेला आदेश दिले आहेत. ते बदल झाल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन्स सुरु करण्यात येतील.

लॉकडाऊन झाल्यापासून एटीव्हीएम मशीन बंद आहेत. केवळ तिकीट खिडक्यांवर तिकीट काढता येत आहे. मात्र प्रवाशांची संख्या वाढल्याने तिकीट घेण्यासाठी रांगा लागत आहेत. त्या कमी करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. रेल्वे बोर्डाने ५ नोव्हेंबरला मध्य आणि पश्चिम रेल्वेला या विषयात एक पत्र लिहिले. त्या पत्रात एटीव्हीएम मशीन सुरु करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.

मात्र, या मशिन्स कधीपासून आणि कोणकोणत्या स्थानकांवर सुरु करायच्या याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सोपवला आहे. या मशिन्सचे तंत्रज्ञान क्रिस नावाची रेल्वेची संस्था बनवते. त्या संस्थेला, ज्यांच्याकडे स्मार्टकार्ड आहेत, त्यावरील कालमर्यादा वाढून देण्यात यावी असे देखील रेल्वे बोर्डाने सांगितले आहे. तसेच परवानगी नसलेल्या प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही, याची काळजी घ्यावी असे रेल्वे बोर्डाने पत्रात नमूद केले आहे.