नवी दिल्ली (प्रतिनिधी) : मोदी सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केल्यानंतर  आता बीपीसीएल, बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात या ६ कंपन्यांचे खासगीकरण कऱण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात या कंपन्यांची विक्री करण्याची योजना केंद्राने आखली आहे, अशी माहिती इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी दिली आहे.

बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांची आर्थिक बोली डिसेंबर-जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या बहुप्रतिक्षित आयपीओची प्रतीक्षाही संपणार आहे. कंपनीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च दरम्यान बाजारात दाखल होऊ शकतो. सरकार एलआयसीमधील १० टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकणार आहे. यातून त्यांना १० लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.