कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस असल्याचे सांगून तीन भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. याबाबत जयश्री जयसिंग तांदळे (वय ६५, रा. भुसार गल्ली उत्तरेश्वर पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयश्री तांदळे या दुपारी गंगावेश येथील भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. भाजी खरेदी केल्यानंतर त्या शिवाजी पेठ येथील घराकडे चालत जात होत्या. त्या रंकाळा स्टँड समोर एका बेकरी समोर आल्या असता, त्यांच्याजवळ आलेल्या तीन तरुणांनी आम्ही पोलीस आहोत, काही अंतरावर एका महिलेचा खून झाला आहे, असे बतावणी करत तुम्ही अंगावरील दागिने पर्समध्ये काढून ठेवा असे सांगितले.
त्यानंतर तांदळे यांनी त्यांच्याकडील सोन्याची चैन आणि अंगठी पर्समध्ये काढून ठेवली. दागिने पर्समध्ये ठेवल्याची खात्री करण्यासाठी त्यातील एका तरुणाने तांदळे यांच्याकडील पर्स आपल्याकडे घेतली. तांदळे यांना बोलण्यामध्ये गुंतवून पर्समधील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने हातोहात लांबवून, ते तिघे तरुण पसार झाले. काही वेळानंतर पर्समधील दागिने त्या तिघा भामट्यांनी लंपास केल्याचे तांदळे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी रात्री त्या तिघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.