मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा मणिपूरमधून सुरू झाल्यानंतर 20 मार्चला मुंबईत संपणार आहे, मात्र यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत पक्षातून काढता पाय घेतला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

मुंबईच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नांवरून राजकारण तापले आहे. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेना (शिंदे) मध्ये प्रवेश केल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून रिलीज व्हायचा आहे. तेव्हापासून देवरा यांच्यासारखे आणखी काही नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत का ? असा सवाल खडा झाला आहे.

देवरा यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांचे नाव चर्चेत आहे. लवकरच ते शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार आणि नंतर मंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. देवरा गेल्यानंतर जेव्हा नसीम खान यांच्या नावाची चर्चा झाली तेव्हा नसीम खान यांची पहिली प्रतिक्रिया होती ती नाकारण्याची.

मी काँग्रेस पक्षात असून पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मोहम्मद आरिफ (नसीम) खान हे यापूर्वी महाराष्ट्राचे मंत्री राहिले आहेत. 2009 मध्ये ते मंत्री झाले तेव्हा. 1960 मध्ये राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यमंत्री (शहरी) बनणारे ते पहिले मुस्लिम होते.