मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. कालच कोल्हापुरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलय. महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीतून शाहू महाराज छत्रपती उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांपैकी कोण बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले, चोरलेल्या धनुष्याला विजयी करण्यासाठी शिंदे गट पैसे वाटप करत आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी नकली शिवसेना राबत आहे. मुख्यमंत्री 100 कोटी घेऊन कोल्हापुरातील एका हॉटेलात बसलेत. तोही लुटीचाच माल आहे. महापालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नाही. हे आमदारांना 50-50 कोटी देत आहेत. खासदारांना 100-100 कोटी देत आहेत, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

राऊत पुढे म्हणाले, आनंद दिघे यांची संपत्ती किती आहे, असा सवाल मला उद्धव ठाकरे यांनी केला होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही दिघे साहेबांच्या इस्टेटीची चौकशी केली, असं त्यांचं म्हणणं आहे. दिघे साहेबांची इस्टेट असून असून काय असणार? त्यांची एकमेव इस्टेट आनंद आश्रम. शिंदेंनी ही इस्टेट हडप केली. आपल्या सर्वांचं मातोश्री आहे. तसं ठाण्यात आनंद आश्रम आहे. ते त्यांनी स्वत:च्या नावावर करून घेतलं. इतकी लफंगेगिरी करणारा माणूस हा दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेबांचा वारसदार होऊ शकतो?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. आता संजय राऊतांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे