गारगोटी (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या चालढकलमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरीचा आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प अद्यापही जैसे थेच आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून या प्रकल्पास २० कोटी ६२ लाखांचा निधी मिळूनही संबंधित खाते व ठेकेदार कामास सुरुवात का करत नाही ? सबब हे काम तत्काळ सुरु न केल्यास जनआंदोलन सुरू करण्याचा  इशारा मिणचे सरपंच सचिन गुरव यांनी दिला आहे.

सरपंच सचिन गुरव म्हणाले की, प्रकल्पाचे काम रखडल्याने लाभक्षेत्रातील आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, नवरसवाडी, लोटेवाडी, बोंगार्डेवाडी, मोरस्करवाडी या गावातील शेतकरी हावालदिल झाले आहेत. शासनाच्या जलसंधारण विभागाने २००७ मध्ये प्रकल्पासा मंजुरी दिली आहे. २७.५७ मीटर उंची, ३ मीटर रुंदी, ३६५ मीटर लांबी, १३८ दशलक्ष घनमीटर साठवणूक क्षमता, ३५ मीटरचा सांडवा व ४ किमी लांबीचा कालवा असे या प्रकल्पाचे स्वरुप आहे.

१५५ हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पाच्या ४ कोटी ११ लाख ४९ हजार रुपये खर्चास मान्यता मिळाली. त्यानंतर पुर्नवसनाचा प्रश्न आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे  प्रकल्प ९ वर्ष रेंगाळला. फेबुवारी २०१६ मध्ये प्रकल्पाच्या कामास पुन्हा सुरवात झाली. सुधारीत अंदाजपत्रकानुसार २० कोटी ६२ लाख रुपये निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून आ. प्रकाश आबिटकर यांनी वाढीव निधी मंजूर करून आणला.

परंतु, निधी मिळूनही ठेकेदार व संबंधित खात्याने गेली १४ वर्षे प्रकल्पाच्या कामाला सुरवात न केल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ७ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तांबड्या मातीतून हिरवीगार पिकं घेण्याची स्वप्न पाहाणाऱ्या या परिसरातील शेतकऱ्यांचा आप्पाचीवाडी प्रकल्प पुर्णत्वास जाणार कधी ? याची चिंता लागून राहिलेली आहे. दरम्यान, आम्ही जनआंदोलनाचा इशारा दिला असल्याचे सरपंच सचिन गुरव यांनी संगितले.