इचलकरंजी, (प्रतिनिधी ) : कोरोनाच्या काळात खंड पडला असतानाही उरलेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.मतदारसंघात विविध विकास कामासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 8 हजार 200 कोटी तर चंदुर गावासाठी 23 कोटी 12 लाख 28 हजार रुपयांचा निधी खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे, अशा विकासाभिमुख खासदाराला पुन्हा खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल,असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

चंदुर (ता. हातकणंगले) येथे ताराराणी पक्षाच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.पुढे बोलताना खासदार डॉ.शिंदे म्हणाले, ” मतदारसंघात आवाडे गटाची ताकद मोठी आहे. ते आता धैर्यशील यांच्या प्रचारात जोरदार उतरले आहेत.आवाडे गटाची संपूर्ण ताकद धैर्यशील यांना मिळाल्यास गतवेळचे लीड डबल होईल.मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मताधिक्य द्यावे.” आमदार प्रकाश आवाडे यांनी विरोधक मत मागत असताना त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे माहीत नाही. दुसरीकडे जगात आपल्या देशाचे नाव लौकिक वाढवणाऱ्या मोदींच्या पाठीशी आपण देशवासीय राहूया असे आवाहन केले.

उमेदवार धैर्यशील माने यांनी, मतदार संघात केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी राहुल आवाडे यांचेही भाषण झाले. स्वागत हातकणंगले पंचायत समितीचे मा .सभापती महेश पाटील यांनी केले. यावेळी सरपंच स्नेहल कांबळे, जगोंडा पाटील, धुळाप्पा पुजारी आदी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.