नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) प्रख्यात उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांची 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे, अशी घोषणा ज्ञानपीठ निवड समितीने आज शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे. गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामांसाठी ओळखले जातात आणि ते या काळातील सर्वोत्तम उर्दू कवी मानले जातात.

गुलजार यांना यापूर्वी 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि त्यांच्या कामांसाठी किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.

एका निवेदनात, ज्ञानपीठ निवड समितीने म्हटले आहे की, “दोन भाषांमधील नामवंत लेखकांना ( 2023 साठी ) पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक श्री गुलजार.” गोव्यातील लेखक दामोदर मौझो यांना 2022 मध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता.