कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले चार दिवस पावसाची संतधार सुरू असून, पाटगाव येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सांडव्यावरून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात पडणारा मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मागील वर्षी पाटगाव धरण ११ सप्टेंबरला भरले होते. यावर्षी देखील याच तारखेला हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यावर्षी जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला होता. त्यावेळी धरणामध्ये ८४ टक्के पाणीसाठा होता. सध्या गेले चार-पाच दिवस धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात सुमारे पावणेचार टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

जूनपासून धारण परिसरात आजअखेर सुमारे ५२५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ६२६.६० मीटर इतकी झाली आहे. आजचा एकूण पाणीसाठा १०५ दशलक्ष घनमीटर इतका आहे. तालुक्यातील कोंडुशी, नागणवाडी आणि फये लघु प्रकल्प अगोदरच भरले आहेत. पावसाची संततधार सतत सुरू असून, वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीचे पाणी पात्रा बाहेर गेल्याने नदीकाठच्या ऊस पिकासह भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीवर भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी वरुटे, पाटबंधारे अधिकारी महेश चव्हाण, शाखा अभियंता मनोज देसाई हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पाटगाव धरण भरल्याने भुदरगड तालुक्यातील शेतीचा तसेच कागल व कर्नाटक राज्यातील काही गावांचा वर्षभराचा पाणी प्रश्न सुटला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.