पन्हाळा (प्रतिनिधी) : पडसाळी, पोंबरे, नांदारी, बर्की या लघुप्रकल्प क्षेत्रात पावसाची तुफान वृष्टी होत आहे. त्यामुळे हे लघु प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.

कासारी धरण क्षेत्रातदेखील पावसाचा जोर कायम असल्याने या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. बाजार भोगाव, पुनाळसह पन्हाळा पश्चिम परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मल्लिका अर्जुन, जांभळी, कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. या भागातील लहान मोठे ओढे, नाले देखील मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. या परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे फेसाळत कोसळू लागले आहेत. पसरलेली दाट धुक्याची झालर पर्यटकांना आकर्षित करत आहे. कासारी नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.