कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमधे व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरला पर्याय ठरत असलेल्या ऑक्सिजन कौंन्सेटेटर आणि बायपॅपची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय रुग्णालयांमध्ये सीएसआर फंडामधून ऑक्सीजन कोंन्सेटेटर आणि बायपॅप उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी या वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर ठरत आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध होणार नसलेल्या रुग्णांलयामध्ये या उपकरणांचा मोठा लाभ होईल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी ४० ऑक्सिजन कोंन्सेटेटर तर २५ बायपॅप उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.