चंदगड (प्रतिनिधी) : काही राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याच्या विरोधात हेरे येथील रमाकांत गावडे यांचे १६ ऑक्टोबरपासून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने याची कोणतीच दाद घेतली नसल्यामुळे त्यांना न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हापरिषद आणि प्रांत कार्यालय येथे एकाच वेळी आत्मदहन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नितीन फाटक यांच्यासह चौघांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काही राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गावडे यांचे कागदोपत्री दोन आई-वडील दाखवले आहेत. तसेच खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे. वेळोवेळी धमकी देवून मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे या सर्वावर कारवाई व्हावी यासाठी १६ ऑक्टोबरपासून चंदगड पंचायत समितीसमोर रमाकांत गावडे यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. याची आजपर्यंत कोणतीच दखल चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी घेतली नाही. यामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी वारंवार करूनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यामुळे प्रख्यात समाजसेवक आनंदराव हे जिल्हाधिकारी कार्यालयात, भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष नितीन फाटक हे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा गोरल हे पोलीस अधीक्षक यांच्या दालनात, तर युवा कार्यकर्ते अमृत गावडे हे प्रांत कार्यालयात आत्मदहन करणार आहेत असा इशारा देण्यात आला आहे. सदरचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.