कसबा बावडा ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत “टेक्नोत्सव 2024” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

महाविद्यालयाचा आर्किटेक्चर विभाग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, केमिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, मेकॅनिकल आदी अभियांत्रिकी विभागांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून इंडस्ट्री मधील विविध समस्या सोडविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेकरिता राष्ट्रीय स्तरावरील विविध महाविद्यालयानी सहभाग नोंदवला असून दीड लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात येथील विविध संस्थेचे विद्यार्थी सदर स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेत जास्तीत जात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली कौशल्य सदर करावी असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक डॉ.के. टी.जाधव यांनी केले.