सातारा (प्रतिनिधी) : आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एका गाडीला शिरवळ येथे भीषण अपघात झाला. या गाडीला आयशर ट्रकरने धडक दिली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाल्याची माहिती शिरवळ पोलिसांनी दिली.

 

वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. सातारा-पुणे महामार्गावरच्या शिरवळ खंडाळा येथे झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे या गावातील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळातील हे वारकरी आहेत. वारकऱ्यांची ट्रॅक्टर-ट्रॉली शिरवळ या ठिकाणी आली असता पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रकही उलटला, तर ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. या ट्रॉलीच्या मागचा भागाचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ३० जखमींपैकी ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना तातडीने रूग्णवाहिकेतून खासगी आणि शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.